राजेंद्र हगवणेला आश्रय देणार्‍या पाच जणांना अटक   

माजी आमदाराच्या मुलाचा समावेश

पिंपरी : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी बावधन पोलिसांनी सोमवारी मोठी कारवाई केली. वैष्णवीचे सासरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना आश्रय दिल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे (वय-६०, वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय-५५, लोणावळा), अमोल विजय जाधव (वय-३५, पुसेगाव, खटाव, सातारा), राहुल दशरथ जाधव (वय-४५, पुसेगाव, खटाव, सातारा), प्रीतम वीरकुमार पाटील (वय-४७, कोगनोळी, ता. चिकोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक) अशी त्यांची नावे आहेत. 
 
प्रीतम पाटील हा कर्नाटकातील काँग्रेसचे माजी आमदार वीरकुमार पाटील यांचा मुलगा आहे. या सर्वांना आज (मंगळवारी) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे सात दिवस फरारी होते. या काळात ते पुणे, सातर्‍यासह महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात फिरले. तेव्हा त्यांना काल अटक केलेल्या आरोपींनी आश्रय दिला होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर हेरिटेज रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी मुक्काम केला होता. यासाठी प्रीतम पाटील याने मदत केली होती.
 
त्याचप्रमाणे राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा सुशील सातारा जिल्ह्यातील पुसेगावात अमोल जाधव यांच्या शेतात काही वेळ थांबले होते. जाधव यांच्याकडे हगवणे यांचे शर्यतीचे बैल सांभाळायला असतात. तसेच, हगवणे पितापुत्र वाडगाव मावळमध्ये बंडू फाटक यांच्या मालकीच्या फार्म हाऊसवरही मुक्कामाला होते, हे समोर आले होते. पोलिसांनी चौकशीनंतर हगवणे पितापुत्राला आश्रय देणार्‍या सर्वांना अटक केली आहे.
 

Related Articles